Sunday, August 16, 2009

चिन्मय शेती

आपली शेती ही आपली देवी आहे, आपण शेतकरी-पुजारी. तिची पूजा करणे, स्तुती करणे आपले आध्य कर्तव्य आहे. “चिन्मय”; देवाची स्तुती करण्यासाठी वापरण्यात येणारे विशेषण ते! चैतन्यने परिपूर्ण असा अर्थ होतो त्या शब्दाचा. ज्ञानाने ओतप्रोत भरलेला असाही अर्थ होतो त्याचा. "चिन्मय शेती" म्हणजे "ज्ञानाने भरलेली चैतन्य पूर्ण शेती" या अर्थी ती शब्द रचना. त्यात शेताचा आदर आहे, मान आहे, सन्मान आहे, स्तुती आहे, आपले विचार आहेत आणि आपल्या गुंतलेल्या भावनाही आहेत त्यात.संपूर्ण-ज्ञान देवा शिवाय कूणाकडे आहे? मानवाला ते हळूहळू संकलित करावे लागते. "अंगवर कपडे नाहीत" हे समजल्या क्षणा पासून आज पर्यंत आणि पुढे अनंत काळा पर्यंत ज्ञानार्जन कघिच संपणारे नाही. तेव्हा हे माझे (ज्ञान) हे तुझे (ज्ञान) असे म्हणून वेगवेगळे संसार मांडण्यापेक्षा एकत्रित येऊन सामूहिकरित्त्या ज्ञानार्जनाचा ध्यास घेतला तर ज्ञान संकलन जलद गतीने होईल. ते चिरकाळ पर्यंत टिकून राहील. पुढच्या पीढ्यांसाठी ते चैतंन्यमय ठरेल. आपण सारे शेतकरी; तेंव्हा मी फक्त शेती क्षेत्रा विषयी बोलतोय. हे एकट्या दुकट्याचे काम नव्हे, या कार्यात तुमचा सहभाग आणि तुमचे सर्वांचे सहकार्य अपेक्षीत आहे."चिन्मय शेती" केवळ आणखी एक शेती पद्दत नव्हे तर शेतीला परिपूर्ण करण्याचा प्रयत्‍न आहे. भारतातील "पुरातन" शेती संस्कृती संभाळण्याचा अट्टहास देखील आहे. भारतीय ते सारे चांगले आणि परदेशी ते वाईट असा दुजाभाव ठेवलेला नाही. संपूर्ण जगातील अनुभवसिद्द पुरातन आणि पारंपारिक शेती पद्धतींतुनही अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत; त्यांना आपल्या वातावरणाशी जुळते करून एकरूप करण्याचा प्रयत्‍न केला आहे. जुने ते सोने आणि नवीन ते सारे तकलादू असा पूर्वग्रहही न बाळगता कांही पुरातन पद्धतींना नव विज्ञानाची झालर लावण्याचे धाडस केले आहे. त्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्‍न केला आहे. याला कुणी नक्कल म्हणेल कुणी चौर्य म्हणेल; म्हणोत! "पुरातन शेती पद्दतिंना पुन्हा एकदा शेतावर आणण्याचा प्रयत्‍न आहे" असे मी ते अगोदरच कबुल केलेले आहे. या प्रयत्‍नात नव्यांनाही मोकळे सोडलेले नाही, अनेक पद्दतींतून चांगल्या चांगल्या गोस्टी घेतल्यात. तेंव्हा मित्रहो मला संभाळून घ्या. हा प्रयत्‍न तुम्हाला रुचला तर तो तुमचा; नाहीतर माझा आहेच.माझा सर्वात मोठा शिक्षक आहे निसर्ग. त्यातून मी अनेक गोष्टी शिकलोय आणि त्या घेतल्यातही. निसर्गाचा थोर निरीक्षक चार्ल्स डार्विन याने "वेजिटेबल मोल्ड" (१८८१) (The formation of Vegetable Mould through the action of Worms) हा गांडूळे आणि वनस्पतींच्या बाबतीतील सर्वात महत्वाचा निरीक्षण प्रबंध लिहिला आहे. त्याचा मला चांगलाच उपयोग झालाय. (पुस्तक या संकेत स्थळावर (वेब साईटवर) वाचायला मिळेल http://charles-darwin.classic-literature.co.uk/formation-of-vegetable-mould/)खर्‍या अर्थाने शेती जीवाणूच करीत असतात. आपण फक्त त्यांना साजेशी परिस्थिती शेतात निर्माण करायची. "त्यांना सतत ताजे तवाने, स्फूर्तिदायक, चैतंन्यपूर्ण, चिन्मय ठेवायचे" एवढेच साधेसुधे मर्म आहे या सध्यासूध्या चिन्मय शेतीचे!“चैतन्य” म्हणजे केवळ जिवंत असणे नव्हे; तर स्फुर्तिमय जीवन जगणे. शेतावर चैतन्य आणणे म्हणजे या सर्वात चैतन्य निर्माण करणे, केवळ मित्र जीवाणूंचा विचार न करता त्यात मित्र बूरशी, मित्र कीटक, मित्र पक्षी, मित्र प्राणी, गांडुळे, मधमाश्या, भूंगे, बेडूक, सरडे, पाली, पाळलेले पक्षी, शेताला खते पुरवणारी जनावरे, दुभति जनावरे, तणे, राबणारी माणसे, मालक आणि हो ज्यासाठी आपण एवढी धडपड करतो, एवढा खटाटोप करतो त्या पिकांचाही समावेश त्यात आहे! ही सारी मंडळी एकमेकांची स्फूर्ती स्रोत्रे आहेत ही सारी एक मेकावर अवलंबुन असतात; यालाच निसर्गचक्र म्हणायचे. ही मंडळी सुखी समाधानी असतील तर चैतन्य तेथे नांदेल. या चक्राची सर्व दाते शाबूत आणि मजबूत असतील तरच हे चाक फिरू शकेल. दिवसाचे २४ तास; वर्षाचे ३६५ दिवस हे चक्र पूर्ण तकातिने एक सरख्या गतीने फिरत ठेवणे ही कला आहे. तिचे नाव "चिन्मय शेती".जमिन तयार होऊन कित्तेक योजने उलटलीत. त्यावर फार फार पुर्वी पासून निसर्ग शेती कारितो आहे. शास्त्रीय द्रृष्ट्या पहिले तर एक पेशीय प्राण्याच्या आगमाना पुर्वी पासून, आध्यात्मिक द्रृष्ट्या पाहिले तर देवाने मानवस निर्माण करण्या अगोदर सृष्ठीची निर्मिती केली तेंव्हा पासून निसर्ग शेती करतो आहे. आजही त्याचे शेती करणे चालूच आहे. तो सारे कांही एकत्रितपणे पेरतो आणि उगावतो. त्यात तो पूर्ण पणे यशस्वी आहे!त्या मानाने मानवाने नुकतीच म्हणजे ७ ते १० हजार वर्षां पुर्वी शेतीला करायला सुरूवात केली आहे. त्याला अजुन खूप कांही शिकायचे आहे.निसर्गातुन त्याने त्याच्या सोईच्या केवळ कांही वनस्पतींचीच निवड करून त्याची वेगळी लागवड केली. त्या वेळी तो निसर्गाशी एकरूप राहून शेती करायचा. मानवाची शेती पुर्वी निसर्गा एवढीच यशस्वी होती. ह्व्यासा पोटी मागच्या १०० वर्षात त्याचे गणित कुठे तरी चुकले. त्या चुकीची फळे आपण आज भोगतो आहोत. मागच्या कोट्ट्यावधी वर्षात पृथ्वीचे जेवढे नुकसान झाले नाही त्या पेक्षा किती तरी पट जास्त नुकसान मागच्या शंभर वर्षात झाले आहे. वातावरणाचे नुकसान करण्यात शेतीचा वाटा मोठा आहे. तेंव्हा शेतीच्या गणिताचे चुकलेले समीकरण शोधून त्याची पुनर्मांडणी कारण्यची वेळ हीच आहे. कदाचित एकूण प्रदुशण धिमे करून हळूहळू नष्ट करण्याचे शेती हे साधन होऊ शकते.या प्रकाशना शिवाय आणि (कदाचित) नंतर येणार्‍या पुस्तकाच्य पुनर्मुद्रणा शिवाय या शेती पद्दतीचा कसलाही प्रचार किंवा प्रसार करण्याचा प्रयत्‍न मी करणार नाही. शेतकर्‍यांना ती आवडली तर ती आपोआप पसरेल. चिरस्थाई होईल.

उद्देश

शेताची भौतिक स्थिती सुधारून जनतेला चवीष्ठ, सकस, दर्जेदार अन्न पुरवठा करणे हा उद्देश आहेच; शिवाय उत्पादन खर्च कमी करून शेताची उत्पादकता अनेक पटीने वढवून शेतकर्‍यांचा आर्थिक उद्धार घडवून आणणे हाही उद्देश आहे."अन्न समाज घडवतो" या म्हणण्यात तथ्य आहे. हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेले आहे. थोडा विचार केलात तर ते पटण्या सारखेही आहे. सकस अन्न सेवनाने शरीर सुधृड होते, शरीरात योग्य प्रकारची हवीत तेवढीच रासायने, संप्रेरके वगैरे तयार होतात. यापैकी कांही संप्रेरकांमुळे विचार स्फूरतात, आपले वागणे आपल्या विचारांवर अवलंबुन असते. स्वस्थ-निरोगी शरीर, स्वस्थ-निरोगी रासायनांची निर्मिती, स्वस्थ-निरोगी विचार, आणि त्या द्वारे स्वस्थ-निरोगी वागणे असे ते समीकरण आहे. समाजातील प्रतेक घटक सुधृड होईल तर संपूर्ण समाज सुधृड असेल. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही.
समाजाला समाज सुधारकांची गरज नसते; तर सकस अन्न पुरवणार्‍या शेतकर्‍यांची नितांत गरज असते. “एक शब्दही न ऊच्चारता समाज सुधारणारा स्थितप्रज्ञ” असाही शेतकर्‍यांचा गौरव होऊ शकतो! एवढे मोठे कार्य करूनही अलाहिदा रहाणारा, या सर्वाचे श्रेय स्वता: कडे येते हे माहीतही नसलेला संत महात्मा!